ज्येष्ठ क्रिकेटपटू, संघटक व समीक्षक बाळ जगन्नाथ पंडित यांचे दीर्घकालीन आजाराने येथे निधन झाले. मृत्युसमयी ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.

पंडित यांनी प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये रोहिंग्टन बारिया चषकासह अनेक स्पर्धामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. खेळाडूपेक्षाही त्यांनी क्रिकेट संघटक व समीक्षक म्हणून जास्त ख्याती मिळविली. त्यांनी अनेक वर्षे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर विविध पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. संघटनेच्या मार्फत अनेक जिल्ह्य़ांमध्ये क्रिकेटच्या विविध उपक्रमांद्वारे त्यांनी खेळाचा प्रसार केला.
उत्कृष्ट भाषाशैली व स्पष्ट उच्चाराद्वारे मराठीतून क्रिकेटचे समालोचन सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शुद्ध मराठी भाषाच समालोचनात हवी असा त्यांचा आग्रह होता. उसळत्या चेंडूला आपटबार हा त्यांनी आणलेला शब्द अतिशय लोकप्रिय झाला. समालोचनाबरोबरच अनेक वृत्तपत्रे व नियतकालिकांमध्ये क्रिकेटविषयक त्यांनी विपुल लेखन केले. त्यांना राज्य शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याचबरोबर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, पुणे महानगरपालिका, पुणे विद्यापीठानेही त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज संस्था आदी विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांवरही त्यांनी काम केले होते.