आपल्या मुलांची प्रचलित शिक्षणपद्धतीत घुसमट होत आहे असे वाटणाऱ्या पालकांनी गृहशाला (होमस्कूलिंग) या पर्यायाचा, आर्थिक स्तर, मातृभाषा किंवा शहरी- ग्रामीण अशी भीती न बाळगता बिनधास्त विचार करावा. ही शिक्षणपद्धती, मुलांचे कुतूहल जिवंत ठेवून त्यांना स्वनिर्मितीचा आनंद देण्यासाठी अत्यंत योग्य पर्याय आहे..

परीक्षेत चांगले गुण मिळवणे, विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे देणे, शाळेतल्या उपक्रमांमध्ये भाग घेणे, हे सगळे करणारा, मुळातच हुशार असलेला एखादा मुलगा, शाळेत जाताना किंवा अभ्यास करताना प्रचंड चिडचिड, त्रागा करत असेल, तर त्याच्या शिक्षणाची, त्याच्या भविष्याची काळजी वाटून पालकांनी अस्वस्थ होणे, गोंधळून जाणे साहजिकच आहे.

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी
chinese company spending huge amount on shameless sales training skills for employees
“तुम्ही जितके निर्लज्ज व्हाल तितका तुमचा पगार वाढेल”, ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देत आहे निर्लज्ज होण्याचे प्रशिक्षण

आम्हीही तीन वर्षांपूर्वी आमच्या मुलाच्या – स्नेहच्या – बाबतीत असेच अस्वस्थ होतो. चार वर्षांत चार शाळा बदलूनही फरक पडत नव्हता. संपूर्ण आठवडा सुट्टी न घेता तो नियमित शाळेत गेला आहे असे कधीच झाले नाही. पुढचा मार्ग ठरवण्यासाठी, आम्ही पालकत्वाविषयी, मुलांच्या शिकण्याविषयी अनेक पुस्तके वाचली, प्रयोगशील शाळा बघितल्या, शिक्षणतज्ज्ञांना भेटलो. त्यानंतर आम्हाला समजले की, स्नेहला शिकण्याचा बिलकूल कंटाळा नाही, तर ज्या शिक्षणपद्धतीमधून तो शिकतोय तिचा त्याला कंटाळा आहे. त्यामुळे शाळा बदलण्यापेक्षा शिकण्याची पद्धत बदलण्याचे आम्ही ठरवले आणि स्नेहसाठी होमस्कूलिंग अर्थात गृहशाला-अध्ययन या पद्धतीची निवड केली.

आमच्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांना, भविष्यासाठी जवळ कसलीही भरभक्कम आर्थिक तरतूद नसताना, एकुलत्या एक मुलाला प्रचलित शिक्षणपद्धतीतून बाहेर काढणे नक्कीच अवघड होते. म्हणूनच सुरुवातील एक वर्ष स्वअध्ययन करू या. जमले तर ठीक, नाही तर परत शाळा आहेच, असा विचार करून, जे शाळेत शिकवतात तेच घरी शिकवायचे असे ठरवले.

आम्ही स्नेहसाठी तिसरीची क्रमिक पुस्तके विकत घेऊन घरातच त्याची ‘शाळा’ घ्यायला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी दोन महिन्यांतच त्याने पुस्तकातील सगळा अभ्यासक्रम म्हणजेच ‘पुस्तकात विचारलेल्या प्रश्नांना अपेक्षित उत्तर देण्याचा सोपस्कार’ पूर्ण करून टाकला. पुस्तकात विचारलेले प्रश्न संपल्यामुळे उरलेले वर्ष कसे घालवायचे, हा प्रश्न पडला. भरपूर मोकळा वेळ मिळाल्यामुळे स्नेहने स्वत:हून पुन्हा क्रमिक पुस्तके उघडली आणि पुस्तकात न विचारलेले पण त्याला पडलेले प्रश्न शोधले!

गणितातील बेरीज-वजाबाकी, भाषेच्या पुस्तकातील म्हणी, वाक्प्रचार, विज्ञानातील पाण्याचे स्रोत, प्रदूषण, हवा, गंध या संकल्पना, तसेच इतिहासातील व्यक्ती, ठिकाणे या सगळ्यांचा रोजच्या जगण्याशी नक्की काय संबंध आहे, याविषयी त्याचे कुतूहल वाढले. ते शमवण्यासाठी आम्हाला क्रमिक पुस्तकांची मर्यादा ओलांडावी लागली. आपोआपच शिकण्याच्या अमर्याद संधी उपलब्ध झाल्या.

आईला स्वयंपाकघरात मदत करत असताना, काम करता करता गप्पांमधून स्नेहला पदार्थाच्या घन, द्रव, वायू या अवस्था, जिन्नस मोजायच्या लिटर, किलोग्राम, तोळा या वेगवेगळ्या मापन पद्धती समजल्या. दूध किलोमध्ये आणि साखर लिटरमध्ये मोजली तर काय फरक पडतो, हे प्रत्यक्ष प्रयोग करून बघता आले. काडय़ापेटीतील काडय़ा वापरून तो त्रिकोण, चौकोन हे आकार व भौमितिक संकल्पना शिकू लागला. एकीकडे पुस्तकात शिकवल्या जाणाऱ्या संकल्पना तो स्वयंपाकघरात शिकत असताना, दुसरीकडे प्रचलित शिक्षण पद्धतीत साधा उल्लेखही नसलेले परंतु जगण्यासाठी आवश्यक असलेले स्वयंपाकाचे कौशल्य शिकायला त्याने सुरुवात केली. वयाच्या दहाव्या वर्षी वरण-भाताचा कूकर लावणे, दूध तापवणे, कधी तरी नूडल्स करून खाणे हेसुद्धा तो शिकला.

शाळेत जात नसल्याने परीक्षेचा प्रश्नच नव्हता. मार्क नव्हते. पहिला-दुसरा नंबर नव्हता. कुणाशीही स्पर्धा नव्हती. त्यामुळे नवीन गोष्ट शिकण्याची सुरुवात पुस्तकातील धडय़ापासून सुरू होऊन घोकंपट्टीच्या वाटेवरून जाऊन परीक्षेपाशी संपण्याऐवजी, ती मुळापासून शिकणे, पूर्णपणे आत्मसात झाल्याशिवाय पुढे न जाणे आपोआप घडू लागले. होमस्कूलिंग करताना मूल्यमापन परीक्षेच्या माध्यमातून होत नसले तरी आधी माहिती नसलेली एखादी नवीन गोष्ट शिकल्यावर त्याची नोंद करणे, महिन्याच्या शेवटी किंवा गरज लागेल तशा त्या नोंदी तपासून घेणे, त्या नोंदीमध्ये गरज पडेल तसे बदल करून त्या अद्ययावत ठेवणे हे सुरू झाले.

परीक्षा, स्पर्धा नसल्यामुळे स्नेहला इतरांविषयी कधीच असूया वाटत नाही. कुणी तरी आपल्या पुढे जाईल, आपण मागे पडू अशी भीतीही वाटत नाही. त्यामुळे त्याचा मित्रांशी असलेला संवाद खूपच निरोगी झाला. ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या संस्कृतीची ओळख नसल्यामुळे, साहित्यिक, सांगीतिक, विज्ञानविषयक कोणत्याही कार्यक्रमात गेल्यावर पडलेले प्रश्न विचारताना किंवा वयाने मोठे असलेल्या व्यक्तींशी बोलून मनातील शंका दूर करून घेताना आवश्यक असलेला आत्मविश्वास त्याच्यामध्ये आपसूकच आला. अभ्यासाचा किंवा शिकण्याचा तणाव नसल्यामुळे मित्रांच्यात किंवा समाजात मिसळणे त्याला सहज व सोपे होत गेले. होमस्कूलिंग पद्धतीने स्नेहला शिकवत असताना शाळा, परीक्षा, पुस्तके म्हणजे शिकण्याचे साध्य नसून अनेक साधनांपैकी एक साधन आहे, हे आम्हाला समजले.

होमस्कूलिंग करतानाचे महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे गणित, भाषा, विज्ञान व इतिहास हे विषय वेळापत्रकाच्या कप्प्यांमध्ये न अडकल्यामुळे इतिहास शिकता शिकता गणित, तर विज्ञान शिकता शिकता भाषा शिकणे सुरू झाले. त्यामुळे महत्त्वाचे व बिनमहत्त्वाचे विषय अशी विभागणी होण्याची भीती टळली. इतिहास, परिसर अभ्यास, तर कधी भाषा या विषयात उल्लेख झालेली ठिकाणे प्रत्यक्ष बघायला जायला आम्ही सुरुवात केली. या ठिकाणापर्यंत जाण्याचा मार्ग शोधण्याच्या निमित्ताने स्नेह नकाशावाचनाकडे वळला. प्रचलित नकाशेवाचन सुरू असतानाच त्याने गुगल मॅपचाही वापर सुरू केला. गुगल मॅपच्या वापरामुळे जगातील कोणत्याही ठिकाणी एकटे जाऊन परत घरी येण्याचा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण झाला. गुगल मॅपचा वापर फक्त नकाशा म्हणून नाही, तर आपण जे ठिकाण शोधतो तेथील फोटो, हवामान, राहणीमान, प्रसिद्ध खाद्यपदार्थ वगैरे सगळीच माहिती मिळवण्यासाठी केल्यामुळे, भूगोल व जोडीला इंग्रजी भाषा हे विषय शिकण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता आला.

तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलते आहे, त्याच वेगाने आजकालची मुले ते आत्मसात करत आहेत, त्याचा चांगला तर कधी गैरवापरही करत आहेत, मात्र शाळेचे अभ्यासक्रम तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलत नसल्यामुळे बाहेरच्या जगात जे दिसते आणि पुस्तकात जे लिहिलेले असते यातील तफावत मुलांच्या सहज लक्षात येते. त्यामुळे त्यांना काही विषय किंवा एकूणच शिकणे कंटाळवाणे वाटू लागते. मात्र होमस्कूलिंग करत असताना, स्नेहचा अभ्यासक्रम ठरवण्याचे आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळते. नवनवीन संकल्पना वापरून शिकणे, शिकताना नवीन प्रयोग करणे आम्हाला सहज शक्य होते.

तंत्रज्ञानाचा शिकण्यात वापर सुरू केल्याने स्नेहला त्याच्या नावडत्या विषयाची नव्याने ओळख करून देणे आम्हाला सोपे जाऊ  लागले. शाळेत असताना मराठी किंवा इंग्रजी भाषा हे विषय स्नेहला अजिबात आवडत नव्हते. तेच विषय स्नेह आता अवांतर वाचन करून व नियमित अवांतर लेखनाच्या माध्यमातून शिकला. अर्थात लिहिण्यासाठी वही-पेनाऐवजी संगणकाचा कळफलक वापरायची आणि वाचण्यासाठी त्याला आवडतील तीच पुस्तके इंटरनेटवर वाचू देण्याची लवचीकता, होमस्कूलिंगचा स्वीकार केल्यामुळे आम्ही दाखवू शकलो व शिकण्यातील अडसर दूर करू शकलो.

आपल्या मुलांची प्रचलित शिक्षणपद्धतीत घुसमट होत आहे असे वाटणाऱ्या पालकांनी, होमस्कूलिंग या पर्यायाचा, आर्थिक स्तर, मातृभाषा किंवा शहरी- ग्रामीण अशी भीती न बाळगता बिनधास्त विचार करावा. ही शिक्षणपद्धती, मुलांचे कुतूहल जिवंत ठेवून त्यांना स्वनिर्मितीचा आनंद देण्यासाठी अत्यंत योग्य पर्याय आहे, याची खात्री चार वर्षांच्या प्रवासानंतर आम्ही देऊ  शकतो, हे नक्की!

चेतन एरंडे chetanerande@gmail.com